शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

बहुरुपी

बहुरुपी 


                           आज जरी तो वरवर नेहमीप्रमाणे शांत दिसत असला तरी आतून मात्र थोडासा भांबावला होता. अनेक विचारांचे मनात काहूर माजले होते. त्याने आजवर स्वतःला जगाच्या नजरेपासून लपवून ठेवले असले तरी आजचा दिवस वेगळा होता. बंद दाराच्या अडून बाहेर चालू असलेली गडबड आणि धावपळ तो बघत होता .  बऱ्याच वेळानंतर त्याने स्वतःला सावरले,आरशाच्या समोर उभा राहीला आणि मग तो नेहमीप्रमाणे शांत झाला.
                           आज त्याचा नागरी सत्कार होणार होता आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक नागरिकांनी, पत्रकारांनी गर्दी केली होती. त्यांनी आज वर बहुरूपी या त्याच्या पेशाच्या माध्यमातून पोलिस खात्यासाठी अनेक अचाट कामगिऱ्या पार पडल्या होत्या. भल्याभल्या गुप्तहेरांना सुद्धा जे जमले नव्हते अशा बातम्या त्यांनी आणल्या होत्या. अनेक वर्ष पोलिसांपासूनही लपून राहत तो हे सर्व करत होता. त्यांनी केलेल्या या कामाचा उल्लेख बाहेर होत होता. त्याचे नाव पुकारण्यात आले आणि तो नेहमीच्या शांत आणि हसऱ्या चेहऱ्याने सर्वाना समोर गेला.
                             सर्वांनी केलेल्या टाळ्यांच्या गजरात तो खुर्ची वर बसला. त्याचा सत्कार झाला मग काही मान्यवरांची  झाली ज्यात त्याने केल्या कामाचे आणि धाडसाचे सर्वांनी कौतुक केले. त्याला बोलायला सांगण्यात आले पण त्याने नम्रपणे नकार दिला. शेजारी बसलेल्या पोलिस महासंचालकांनी तो फक्त काही प्रश्नांना उत्तर देईल असे जाहीर केले आणि त्याला ज्या वेळेची  होती ती वेळ आली. पत्रकारांनी विचारलेल्या कामगिरी बद्दलच्या प्रश्नांना कोणतीही महत्वाची माहिती जाहीर होणार नाही अशी उत्तरे तो देत होता. अनेक उत्तरांनी त्याच्या बुद्धिमत्तेचे, धाडसाचे आणि चातुर्याचे दर्शन होत होते प्रत्येक वेळी जमलेले लोक त्याच्या कामगिरीने तोंडात बोटे घालत होते.
                               अचानक एकाने विचारले " बहुरूपी बनून तुम्ही अशी कामे करू शकता हे विचार आले?" या प्रश्नाने तो चकित झाला पण लगेच म्हणाला " पोटाची खळगी भरता येत नाही म्हणून आत्महत्या करणार होतो आणि त्या वेळी घडलेल्या घटनेने… " सगळे जण चकित होवून बघत होते कोणाचाच विश्वास बसत नव्हता की इतक्या धाडसी कामे करणारा पण आत्महत्येचा विचार करू शकतो? कार्यक्रमाच्या ठिकाणी शांतता पसरली होती आणि तो भूतकाळातल्या त्या दिवसांच्या आठवणीत हरवला होता. बहुरूपी बनून, वेगवेगळी सोंगे घेत पोटापाण्यासाठी काही बाही करत तो गावो गाव हिंडत होता. या अश्या दीनवाण्या आणि लोकांपुढे हात पसरत जगण्याला तो वैतागला होता. सलग ८ वर्ष  फक्त लोकांकडून त्याला हेटाळणी शिवाय काहीही मिळाले नव्हते आणि आपल्या बापाला दिलेल्या वाचनामुळे हा व्यवसाय सोडून दुसरे काही करू शकतही नव्हता. तसा त्यांनी एकदा नेकारी करण्याचा प्रयत्न केला होता पण दिलेले वाचन त्याला रात्री झोपू देत नव्हते म्हणून त्याने नोकरीचा नाद सोडून दिला होता. या अश्या जगण्याला कंटाळून त्याने आत्महत्येचा विचार केला आणि पडलेला ब्लेड उचलला आणि हातावरून फिरवला क्षणात हातातून रक्ताची धार निघाली. त्या वाहणाऱ्या रक्ताकडे बघताना त्याला बापाचे शेवटचे शब्द आठवले " प्वारा, म्या तुला तुह्या मायला कायबी देवू शकलो नाय, आपला धंदाच असा… तोंडाला रंग फसायचा अन गावोगाव भटकायचं. म्या तुला शिकीवले हाय ते लक्षात ठेव कधीबी इसरू नगस. असा जगताना कधी मधी वाईट दिस येतात अन जीव द्यायचा इचार येतो असा झाला तर आपल्या गावच्या भगतला भेट. तुह्यासाठी एक मोलाचा हाय ते… " बा शेवटचे बोलला ते एव्हडाच… नंतर दोनच दिवसात बा गेला. हे आठवल्यावर तो लगबगीत उठला हातावरच्या जखमेवर हळद लावली पट्टी बांधली आणि तसाच रात्री निघाला गावाकडे…
                                    तो गावात पोहोचला तेंव्हा मध्यरात्र झाली होती. बस मधून उतरून तो सरळ नदीच्या दिशेने चालू  लागला. सारे गाव झोपले होते. गावातली कुत्री त्याच्यावर भुंकत होती पण त्याला व्यवस्थित माहित होते कुत्र्यांशी कसे वागायचे असते. गावाचा रस्ता त्याच्या ओळखीचा होता पण बऱ्याच वर्षांनी तो गावात आला होता. गाव फारसे बदलले नव्हते थोड्या फार गोष्टी सोडल्या तर अजून गाव तसाच होते. नाही म्हणायला धुळीने माखलेल्या रास्य्तांवर अधून मधून दिवे दिसत होते. गावात शाळा होती पण अजूनही दवाखाना झाला नव्हता. त्या वाटेवरून जाताना त्यांचे जुने पदके घर दिसले त्याकडे सरळ दुर्लक्ष करत तो पुढे चालू लागला पण अचानक मागे फिरला त्या घरात जावून स्वतःच्या कपड्याची एक चिंधी फाडली आणि त्याचा दिवा लावला. थोडा वेळ तिथे बसल्यावर त्याला त्याच्या बालपणीचे दिवस आठवले पण त्यांना मागे सारत तो भगतच्या झोपडीच्या दिशेने चालू लागला. भगत गावाच्या बाहेर वेशीजवळ झोपडीत राहत होता हे त्याच्या लक्षात होते. तो त्या झोपडीजवळ आला आणि आत डोकावले तर भगत झोपला होता. गाव सोडताना त्याची असलेली काळी दाढी आणि केस आता पूर्ण पांढरे झाले होते. कोपऱ्यात एक मंद दिवा तेवत होता आणि त्याचा मंद उजेड पसरला होता. त्याने विचार केला कि भगत उठायची वाट पाहू आणि सकाळी बोलू पण तितक्यात भगत जागा झाला. तो काही बोलणार त्या आधीच भगत म्हणाला "  मला माहित होते तू येशील तुझा बा पण असाच एकदा जगायला वैतागून आला होता" तो फक्त वेड्यासारखा बघत राहिला. तो आणि भगत बराच वेळ बोलत होते, तो आपली सगळी व्यथा भगताला सांगत होता,  मोकळा होत होता. पाहत होत आली होती आणि भगत त्याला म्हणाला " अशा परिस्थितीत शोध घेणे महत्वाचे" हे म्हणून भगत नदी कडे चालू लागला आणि तो पण उठला आणि गावातून बाहेर पडला.
                              अचानक पडलेल्या कॅमेऱ्याच्या फ्ल्याशने तो वर्तमानात आला. एक पत्रकार विचारात होता " आत्महत्या करण्याचा विचार सोडल्यावर तुम्ही काय केले?" त्याने हसून उत्तर दिले " मी ३-४ वर्ष वेगवेगळ्या गावांमधून, शहरांमधून फिरत होतो. वेगवेगळ्या लोकांच्या वागण्याच्या, बोलण्याच्या आणि राहण्याच्या बारकाव्यांचे निरीक्षण करून त्यातून शिकत होतो. या काळात मी १३ भाषा शिकलो. बहुरूपी होणे हे काही सोपे नसते, प्रत्येक गोष्ट व्यवस्थितच करावी लागते. चुकायला वाव नसतो. याच काळात अनेक वाईट गोष्टी घडताना बघितल्या ज्या पोलिसांना कळवत गेलो आणि मग ही दिशा सापडली आणि आपण समाजाचे काहीतरी भले करू शकतो याची जाणीव झाली. एखादी वाईट गोष्ट होण्यापासून थांबवण्यासाठी आपला हातभार लागतोय हे लक्षात आल्यावर अजून जास्त लक्ष देवून आणि अभ्यास करून या कामाला लागलो. हे एक प्रकारची समाजसेवा करताना बा ला दिलेले वाचन पण पाळले जात होते आणि समाजासाठी काहीतरी करण्याचे समाधान पण मिळत होते. आज १० वर्ष झाली हे असाच चालू आहे" त्याच्या चेहेऱ्यावर मंद स्मित हास्य होते आणि डोळ्यात समाधानाचे भाव…
                                  इतक्यात मागून प्रश्न आला " हे समाजसेवेचे काम तुम्ही किती दिवस करणार?" आवाज ओळखीचा वाटत होता आणि प्रश्न विचारणारा माणूस दिसत नव्हता. तो हासून म्हणाला " प्रत्येक जन कोणत्याना कोणत्या गोष्टीचा शोध घेत असतो. कोणी सुखाचा, कोणी पैशाचा, कोणी समाधानाचा आणि कोणी स्वतःचा… आपले आयुष्य एक शोध मोहीम असते. आज तुम्ही इथे आलात कारण तुम्हाला याचा शोध घायचा होता कि या अचाट कामगिऱ्या करणारा कोण आहे , कसा दिसतो."  तो बोलता बोलता उठून प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीकडे चालू लागला. तो पुढे बोलतच होता "मी बहुरूपी बनून, वेगवेगळे वेश धारण करून, चेहेऱ्याला रंग लावून तुमच्यामध्ये माझा स्वतःचा शोध घेतो आहे. मी कोण आहे या  प्रश्नाचे उत्तर मिळाले की शोध संपला."तो प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडला आणि त्याने प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीची ओळख करून दिली. ती व्यक्ती भगत  होती. भगताच्या चेहेऱ्यावर समाधानाचे हसू होते. तो म्हणाला " स्वतःला सामोरे जाणे सगळ्यात अवघड असते… चेहेऱ्यावर कितीही रांग लावून आरशात खरा चेहरा दिसला की…" एव्हडे बोलून भगत आणि तो बाहेर जाण्यासाठी चालू लागले… आणि भगत वळून म्हणाले "खरा चेहेरा दिसला की आयुष्य शांत आणि समाधानाने जगता किंवा संपवता येते……. " ते दोघे दिसेनासे होईपर्यंत आम्ही त्या पाठमोऱ्या दोघांकडे बघत होतो. खरा बहुरूपी कोण हे मात्र शेवटपर्यंत समजले नाही…….


चेतन कुलकर्णी 

परंपरा

परंपरा           एक गाव होते ... गावातले सगळे जण आनंदी , मनमिळाऊ आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे होते . त्या छोट्याश्...