बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

परंपरा


परंपरा

         एक गाव होते... गावातले सगळे जण आनंदी, मनमिळाऊ आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे होते. त्या छोट्याश्या गावात एक कृष्णाचे मंदिर होते. हे मंदिर सगळ्या पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध होते. खूप वर्षांपूर्वी एका तरुणाला दृष्टांत झाला होता आणि त्याने सगळ्या गावाच्या मदतीने हे मंदिर उभारले होते. सगळ्या गावाने एकमताने त्याला या मंदिराची सर्व व्यवस्था, पुजा-आर्च्या बघण्याची जबादारी दिली होती. त्या तरुणाला सगळेजण महाराज म्हणत... ब्रम्हचारी असलेला तो तरुणही मनापासून सगळे करत असे. त्याला प्राण्यांची प्रचंड आवड होती विशेषतः मांजरांची... म्हणूनच महाराजांनी त्या मंदिरात एक मांजर पाळले होते. दिवसातला रिकामा वेळ ते त्या मांजरासोबत खेळण्यात घालवत असत. गावामध्येसुद्धा महाराजांचे मांजर म्हणून त्याला मन मिळत असे... देवाला रोज गावातल्या कोणाकडून तरी नैवेद्य येत असे... आणि कृष्णाला आवडणारे पदार्थ म्हणजे दूध, दही लोणी हे सगळे त्या नैवेद्यामध्ये भरपूर असायचे. देवाच्या समोर नैवेद्य ठेवला कि महाराजांचे मांजर त्याच्या पायापाशी घोटाळू लागायचे तर कधी नैवेद्यामध्ये तोंड घालायचे... असे रोजच होतंय असे लक्षात आल्यावर महाराजांनी नैवेद्य दाखवायच्या आधी मांजराला बांधायला सुरुवात केली.

         अशी बरीच वर्षं गेली. आता महाराज म्हातारे झाले होते आणि मधल्या काळात अनेक मांजरे आली आणि गेली. आणि एक दिवस महाराजांचे निधन झाले. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. संपूर्ण गावाने १० दिवस सुतक पाळले आणि मग सुरु झाला तो शोध... मंदिराच्या नवीन पुजारी किंवा महाराजांचा... थोड्याच दिवसात त्या शोधकार्याला यश आले आणि गावात नवीन पुजार्यांचे आगमन झाले.

        नवीन पुजारी मंदिरात आल्याच्या निमित्ताने गावजेवणाचा बेत ठरला आणि आगळे गाव जोमाने कामाला लागले. मंदिराच्या परिसरात सगळे गाव जमले... जोरदार आरती झाली आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य आणण्यात आला आणि तो नवीन पुजाऱ्यांच्या हातात देण्यात आला... आता नवीन महाराज नैवेद्य दाखवणार तेव्हढ्यात कोणीतरी ओरडले "थांबा"... सगळीकडे कुजबुज सुरु झाली... गावाच्या सरपंचाने -१० जणांना कुठे तरी पिटाळले... आता त्या गेलेल्या पोरांची सगळे जण वाट बघत होते... एव्हढ्यात गलका झाला... "आले, आले"... त्यांनी कापडात झाकून काहीतरी आणले होते... ते कापडात गुंडाळलेले "काहीतरीघेऊन सरपंच  पुजाऱ्यांकडे गेले.
सरपंच म्हणाले " या मंदिराची खूप जुनी परंपरा आहे, हे घ्या मांजर आणि त्याला त्या तिकडे कोपऱ्यात बांधा... आणि प्रत्येक वेळी नैवेद्य दाखवायच्या आधी हे करायचे असतं... आमचे महाराज म्हणायचे असं  नाही केले तर देवाला नैवेद्य मिळत नाही म्हणून... हि परंपरा आपल्याला पाळायलाच हवी..."  



©चेतन 

परंपरा

परंपरा           एक गाव होते ... गावातले सगळे जण आनंदी , मनमिळाऊ आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे होते . त्या छोट्याश्...