सोमवार, २४ मे, २०१०

विचार मंथन : माणूस का जगतो?

मधंतरी एक मराठी पुस्तक वाचताना, माणूस का जगतो? असा प्रश्न समोर आला आणि डोक्यातील विचारांचे चक्र जोराने फिरू लागले. बराच विचार करून करून मी परत परत याच निष्कर्षापर्यंत येत होतो. आत्ता तेच विचार मंथन तुमच्या समोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे...तुम्हाला या सगळ्यावर काय वाटते ते जरूर कळवा यामुळे तुमचे आणि माझे विचार अजून समृद्ध व्हायला मदत होणार आहे...

माझ्या मते, जर माणसाला जगायला लागणाऱ्या गोष्टींची यादी केली तर तीन गोष्टी अथवा भावना यांचा क्रमांक सर्वात वर ठेवावा लागेल.

आठवणी : कोणताही मनुष्य आठवणींशिवाय जगू शकत नाही. तुम्ही म्हणाल कसे काय...? आपण तर बरेचदा काही आठवणी कायमच्या पुसून टाकता आल्या तर किती बर होईल असा विचार करत असतो मग आठवणीशीवाय माणूस जगू शकत नाही हे कसे काय...? तर मग असे करू स्वतःला काहीही आठवत नाही असा विचार करू. आपले नाव, गाव , आपण कोण आहोत , कुठे आहोत सगळे विसरलो तर काय अवस्था होईल... कालच जोडीदाराबरोबर घालवलेल्या रम्य संध्याकाळची आठवण मनात ताजी असताना तिचा आठवण अचानक नाहीशी झाली आहे हा विचार तरी कोणी करू शकेल का....? आपल्या आठवणींमध्ये चांगल्या बरोबर वाईट आठवणी सुद्धा साठवलेल्या असतात... चांगल्या आठवणींबरोबर वाईट आठवणी पण आपल्याला जगताना बरीच मदत करत असतात. पूर्व आयुष्यात घडलेली एखाद्या क्षणाची आठवण आयुष्यभराची सोबत बनून जाते उलट एखादी शेवटपर्यंत त्रास देत राहते. कधी निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारी किंवा निराशेच्या गर्तेत ढकलणारी सुद्धा आठवणच......आणि फक्त आठवणींमध्ये अडकलेल्या माणसाला आपण वेड लागले आहे असेच म्हणतो ना...? म्हणूनच आठवणींशिवाय माणूस जगू शकत नाही असे मला वाटते.....यावर व.पु. काळे यांचे एक वाक्य आठवते आहे... " मनुष्याला आठवणी नकोश्या झाल्या की तो आत्महत्येचा विचार करू लागतो...."

स्वप्न किंवा ध्येय : प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात काहीतरी करायचे असते. प्रत्येकाचे काहीतरी स्वप्न असते.. मग ते अगदी शुल्लक का असेना पण असते...मग कोणीतरी आपल्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या आई वडिलांना सुखात ठेवण्याचे स्वप्न बघतो तर कोणी अंतराळवीर होण्याचे ध्येय / स्वप्न बाळगून असतो तर कोणी आदिवासी भागात "आनंदवन" फुलवण्याचे स्वप्न बघत असतो ... या स्वप्न अथवा ध्येयासाठी आपल्याला होणाऱ्या अपरिमित कष्ट, वेदना, दुःख या सगळ्याकडे दुर्लक्ष करून कोणीतरी आयुष्याची वाटचाल करत असतो...आपल्या ध्येयासाठी / स्वप्नासाठी वेडे झालेले लोक बघितले की स्वप्न / ध्येय याचे महत्व पटल्याशिवाय राहत नाही...आणि आपल्या भारतात तर ध्येयासाठी कितीही (अगदी आयुष्याचाही) त्याग करण्याची परंपरा आहे... ही उज्वल परंपरा डोळ्यासमोर आली की स्वातंत्र्य संग्राम आठवतो आणि मग तर स्वप्न अथवा ध्येय याचे आयुषातले महत्व अजूनच अधोरेखित होते.....

विश्वास (याला बहुदा इंग्रजी मध्ये "Belief System" म्हणतात): जगात चांगल्या बरोबर वाईट गोष्टी, माणसे असतात हे वाक्य बहुदा विश्वास कशाला म्हणतात हे समजवण्यासाठी पुरेसे आहे. प्रत्येक माणूस हा त्याच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी विश्वासावर अवलबून राहतो. कसे...? गाडी चालवत असताना चे उदाहरण घेवू... समजा तुम्ही एक गाडी ओलांडून पुढे जात आहात आणि समोरून भरधाव वेगात कार येत आहे तर तुम्ही पुढे जाताना अपघात टाळण्यासाठी वेग वाढवणार की कमी करणार हे कसे ठरवता? स्वतः वरच्या, गाडीवरच्या विश्वासावरच ना...? जर तुम्हाला कोणताही अपघात न होता आपण सुखरूप पुढे जावू शकू असा विश्वास नसेल तर पुढे जाता का....? मग हा विश्वास निर्माण कसा होतो...आपण एखादी गोष्ट ऐकतो, बघतो.. मग त्यावर विचार करतो.. त्यावर आपले मत बनवतो... ती गोष्ट करून बघण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टींवर आपला विश्वास ठेवण्याची अथवा त्या गोष्टीकडे बघण्याची पद्धत ठरते... माणसाचा चांगुलपणावरचा विश्वास उडाला तर काय होईल? अडचणीच्या वेळी कोणीतरी मदतीला धावून येईल हा विश्वास संपला तर आल्या प्रसंगाला तोंड देण्याचे सामर्थ्य कोठून येणार...? आजाराच्या वेळा आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच विश्वास नसेल तर रोगातून बरे होवू शकू का...? काय वाट्टेल ते झाले तरी आपल्या एका हाकेला मित्र धवून येईल हाच विश्वास नसेल तर..? जे देवाला मानतात त्याच्या मनातला देवावरचा विश्वास नाहीसा झाला तर....?दुःखानंतर सुख येते या वरचा विश्वास उडाला तर ते दुःख आपण पचवू शकू का...? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःवरचा विश्वास उडाला तर जगणे किती कठीण होवून बसेल याचा विचार आपण करू शकतो का...? विश्वासराव गेले पानिपतात असे म्हटले तरी कलियुगात कोणावरही अंधळे पणाने विश्वास ठवू नये यावर आपला विश्वास असतोच ना...? म्हणून तर जगातले बरचसे व्यवहार हे विश्वासावर अवलंबून असतात हे आपल्याला मान्य करावे लागेल.... माझा तुझ्या वर विश्वास आहे हे वाक्य ऐकून आपण मांतून सुखावतो की नाही... पण तेच माझा तुझ्यावर मुळीच विश्वास नाही हे ऐकून व्याकूळ व्हायला होते हे पण तितकेच खरे आहे... आणि हे सगळे वाचल्यावर तुम्हाला पण पटेल की जगताना विश्वास किती महत्वाचा आहे....

हे सगळे माझ्या मनातील विचार आहेत. माझे असे प्रामाणिक मत आहे की वरील तीन गोष्टी जर आपल्या आयुष्यातून बाजूला केल्या तर जगण्यातील मजा निघून जाईल...येणारा प्रत्येक क्षण हा याच तीन गोष्टींशी कुठेतरी निगडीत असतो असे मला वाटते...

--
चेतन कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

परंपरा

परंपरा           एक गाव होते ... गावातले सगळे जण आनंदी , मनमिळाऊ आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे होते . त्या छोट्याश्...