मंगळवार, १० जून, २०१४

कोणालाच ठावूक नाही


 "कोणालाच ठावूक नाही"


मी आत्ता जे काही सांगणार आहे त्यावर विश्वास ठेवायचा कि नाही हे तुम्हीच ठरवा पण मी जे काही सांगतोय त्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे की ही घटना खरी आहे आणि तुमच्या माझ्या सारख्या एका सर्व सामान्य व्यक्तीबरोबर घडलेली आहे.

ही घटना आहे साधारण ३-४ वर्षांपूर्वीची.. त्याची आणि माझी भेट झाली ती एका पानाच्या टपरीवर. तो आणि मी बरेच वेळा एकाच पानाच्या टपरीवर साधारण एकाच वेळी पान खायला असायचो.. एक दिवस ओळख झाली खरी  पण मला असा कधीच वाटले नव्हते कि अशी त्याच्याच आयुष्यातली सर्वात महत्वाची घटना मला गोष्ट म्हणून सांगावी लागेल.. असो.. तर आमची ओळख झाली.. हळूहळू वेगवेगळ्या विशांवर चर्चा करता करता छान मैत्रीही झाली.

तो एका Multinational कंपनी मध्ये कामाला होता. सर्वसाधारण पणे जे सगळ्यांना हवे असते तसा दिसायला सुंदर , समजूतदार, ६ आकडी पगार, चांगला हुद्दा, हाताखाली २०-२५ लोक कामाला, अधून मधून परदेश दौरे,  गाडी, २ मोठी घरे आणि एक सुंदर शी प्रेयसी.. सगळे कसे छान आणि कोणालाही हेवा वाटावे असे.. बोलता बोलता एकदा त्यांनी चा सांगितले होते कि आता लवकरच लग्न कराचे आहे.. दोघांच्याही घरचे तयार आहेत फक्त आम्ही दोघांनी हो म्हणायचा अवकाश आहे..

पण त्यादिवशी तो बरेच दिवसांनी भेटला पण त्याच्या चेहऱ्यावरचे अवखळ हसू गायब होते.. कसल्याश्या तणावात आहे हे पदोपदी जाणवत होते.. नेहमीप्रमाणे बोलत नव्हता कि सगळ्यांना विनाद सांगून हसवणारा आज चांगल्या विनोदावर सुद्धा काहीच प्रतिकिया देत नव्हता.. आमच्या नेहमीच्या टोळक्यातल्या सगळ्यांनी  खोदुन विचारण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसाद शुन्य.. सगळे  निघत असताना मला थोडा वेळ थांब म्हणाला आणि मी काहीही विचार न करता थांबलो. मला दिसत होते कि त्याला बोलायचे आहे पण सगळ्याच्या समोर तो बोलत नव्हता. सगळे गेल्यावर त्यांनी सांगितलेले  ऐकून मी पूर्णपणे हादरून गेलो होतो. त्याचे लग्न मोडले होते आणि तेसुद्धा गेली ४-५ वर्ष त्याला सोबत करणाऱ्या प्रेयासीनी ऐनवेळी दिलेल्या नकारामुळे.. मी चाट पडलो होतो.. काय बोलाचये सुचत नव्हते.. थोड्या वेळच्या शांतते नंतर त्यांनी जे कारण सांगितले ते ऐकून मी अजूनच सुन्न झालो.. मला कळत नव्हते की नक्की कोणाचे बरोबर आहे.. लग्न न करण्याच्या निर्णयाचे कारण होते पाऊस...

 त्यानी पुढे सांगायला सुरुवात केली, " मला लहान पणापासून असे वाटायचे की पाऊस हा काही फक्त आकाशातून कोसळणारा पाण्याचा ओघ नाही तर तो माझा मित्र आहे. लहानपणी बाहेर पूस आला की मी प्रत्येक वेळा पावसात भिजायला जायचो. अंगात ताप असेल आणि मी पावसात भिजलो कि ताप उतरायचा.. जसा जसा मोठा होत गेलो तसे पावसाबाद्दलचे आकर्षण वाढतच गेले. योगायोगाने माझ्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या चांगल्या घटना सुद्धा पावसाळ्यातच घडल्या.. तिला मी पहिल्यांदा पहिले ते पण पावसात भिजतानाच.. माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक वाईट घटनेनंतर जेव्हा कोणी सोबत नसायचे तेव्हा सुद्धा मला सोबत केली ती पावसानेच.. काल तिनी मला लग्न करायला नकार दिला तो ही या पावसामुळेच आणि मी सैरभैर झालो असतानाही मला सोबत केली ती कालच्या पावसानेच.. माझा पावसाबाद्दलचे दिवसागणिक वाढत जाणारे आकर्षण आणि मी पावसाला मित्र म्हणणे हे तिला कधीच आवडले नाही आणि मला वेड लागले आहे अशी संभावना करून ती लग्नाला नाही म्हणाली.. अरे या माझ्या भावना समजावून घेवून मला स्वीकारणे मला अपेक्षित होते पण तिनी मलाच वेडा ठरवले.. " तो असाच बराच  वेळ पावसाबद्दल आणि तिच्याबद्दल बोलत होता आणि मी मंत्रमुग्ध होवून ऐकत होतो. त्याच्या डोळ्यात पावसासाठी कृतज्ञतेचे भाव होते. ते समजूनच कि काय अचानक पावसाची भुरभूर चालू झाली अन आम्ही तिथून घरी जायला निघालो. जाताना विचार आला कि यार याला म्हणतात खरी  मैत्री.. मित्रानी मनापासून आठवण काढावी आणि दुसऱ्याने लगेच समोर हजर व्हावे.. पाऊस आणि आमचा मित्र यांच्यात अशीच गाढ मैत्री होती का.. ?

नंतर ७-८ दिवस तो भेटलाच नाही.. आणि एकदिवस माझा फोन वाजला.. त्याचाच फोन होता.. आत्ताच्या आत्ता भेटायचे आहे म्हणाला.. मला कळेना काय झाले.. मी त्याला येतो म्हणालो तर तो घराच्या खाली येवून उभा होता.. आज तो नेहमीपेक्षा वेगळाच वाटत होता.. त्याला आजच्या इतका आनंदी आणि खुश कधीच पहिला नव्हता. त्याला काही विचारायच्या आधी तो म्हणाला "सगळे सांगतो थोडा वेळ थांब" त्याच्या गाडीतून आम्ही सिंहगडावर गेलो आणि त्यांनी जे काही सांगितले त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते.. बुद्धी सांगत होती कि हे घडणे शक्य नाही पण मन सांगत होते की हे सगळे होते असूच शकत नाही.. मी बुद्धी चे न ऐकता मनावर विश्वास ठेवला म्हणूनच तुम्हाला आज हे सांगतो आहे.. तो जे काही म्हणाला ते जसेच्या तसे तुम्हाला सांगणार आहे... त्यांनी सांगायला सुरुवात केली..

" मी ३ दिवसापूर्वी खूप उदास होतो, काहीच करावेसे वाटत नव्हते. सरळ २ दिवस सुट्टी टाकली आणि कोकणातल्या फार्म हाउस वर जायचे ठरवले. संध्याकाळी गाडी काढली आणि निघालो.. आकाशात ढग भरून आले होते. पाऊस येणार असा वाटत होते. मनातून असा वाटत होते कि आज काहीतरी वेगळे घडतंय.. दाटून आलेले ढग सुद्धा नेहमीपेक्षा वेगळे वाटत होते.. पावसाची भुरभूर चालू झाली होती. सलग गाडी चालवत मी कोकणातल्या फार्म हाउस वर पोहोचलो. पाऊस अजूनही चालू होता. म्हादु काकांनी सगळी तयारी करून ठेवली होती. म्हादु काकांना सांगितले उद्या सकाळ पर्यंत मला काहीही नको आहे तुम्ही जावून झोपा काही लागले तर बोलावतो. घरात असलेल्या आराम खुर्चीवर हातात वाफाळलेली कॉफी घेवून बसलो. मागे मुकेश ची गाणी चालू होती आणि मी गाण्याबरोबर येणाऱ्या पावसाचा आवाज ऐकत कॉफी घेत होतो..

अचानक बाहेर चिक्खल तुडवत कोणी तरी येत असल्याचा आवाज झाला.. आणि दोनच मिनिटात दारावर थाप पडली.. रात्रीचे ११.३० वाजून गेले होते.. मी आतून ओरडलो महादू काका तुम्हाला सांगितले ना मला आज त्रास देवू नका म्हणून.. बाहेर शांतता पसरली.. मला वाटले महादू काका गेले असावेत.. पण पुन्हा दारावर थाप.. मी पुन्हा ओरडलो.. असा ३-४ वेळा झाल्यावर मी वैतागून उठलो आणि दार उघडले.. दारात एक अनोळखी माणूस उभा होता. अंगात मळकट कपडे होते त्यावर विचीत्रसा रेनकोट आणि पायात गमबूट.. बाहेरच्या पावसामुळे लाईट नव्हती त्यामुळे चेहरा नीट दिसला नाही. मी विचारले कोण हवे आहे तर तो फक्त हसला आणि आकाशात वीज चमकली.. मी पुन्हा विचारले तर तो म्हणाला मी तुलाच भेटायला आलो आहे. हा कोण माणूस दारावर उभा आहे काही कळत नव्हते आणि कोन असावा या विचारात असताना तो म्हणाला आत येवू का? ओळख काही केल्या लागत नव्हती तरीही मी त्याला घरात घेतला.. रेनकोट आणि बूट बाहेर काढून तो घरात आला.. रेनकोट काढलेला असूनही माझे घर त्याच्या येण्यानी ओले झाले होते. तो माझ्या समोर असलेल्या आराम खुर्चीवर बसला. मी त्याला कॉफी विचारली पण तो नको म्हणाला. अजूनही काळात नव्हते कि हा कोण आहे आणि मी कोणाला घरात घेतले आहे.. मी त्याला पुन्हा विचारले तर तो पुन्हा हसला.. बाहेर वीज चमकली.. असे दोन तीन वेळा झाल्यावर मी पूर्णपणे चक्रावलो होतो की हे काय चालू आहे.. हा हसतो आणि वीज चमकते का हा फक्त योगायोग आहे..? शेवटी त्यांनी मला त्याचे नाव सांगितले "पाऊस"। मी पुन्हा २-३ वेळा विचारले पण नंतर तो काहीच बोलला नाही. माझा विश्वास बसत नव्हता पण त्यांनी ते मला सिद्ध करून दिले.. त्याच्या इशाऱ्यावर बाहेर पडणारा पाऊस कमी जास्त होत होता, तो हसला कि वीज चमकत होती. उंचीला साधारण माझ्या इतकाच असेल पण तब्बेतीने माझ्य्पेक्षा बारा होता. मला म्हणाला मित्र आज तू उदास आहेस म्हटले जर भेटून येवू, बरेच दिवस तुला भेटायला यायचे म्हणत होतो पण जमत नव्हते पण आज राहवले नाही.. माझा विश्वास बसत नव्हता की माझा मित्र मला भेटायला आला आहे, आणि जो आहे हे सांगून कोणाचा विश्वास बसत नव्हता तो मूर्त स्वरुपात माझ्यासमोर बसून माझ्याशी बोलत होता. जो सगळ्यांना आवडतो, ज्याच्या थंडगार जलधारांमध्ये भिजायला सगळे जण आतुर असतात पण ज्याला सगळे कायमच आपल्या घराच्या बाहेरच ठेवतात त्याच पावसाला मी माझे घर भिजवायला स्वताच्याच हातानी दर उघडून आत घेतले होते. स्वताच्याच हातानी सत्चेच गहर भिजवायला पावसाला घरात घेणारा मी पहिलाच होतो.  त्याच्याशी गप्पा मारताना वेळ पुढे जात होता. मला आतून शांत वाटत चालले होते. मनातले सगळे कोणाशी तरी बोलून किती शांत वाटते याचा अनुभव मी आणि पाऊस घेत होतो.

अचानक तो म्हणाला आज मला बरसायचा कंटाळा आला आहे.. मी जर आराम करतो तू माझा वाटचा बरसून ये.. छान वाटते मन हलके केल्यावर मनसोक्त बरसायला.. हो नाही करता करता मी तयार झालो आणि घराबाहेर जायला निघालो. मी दारात असताना तो म्हणाला रेनकोट घेवून जा उगीच भिजशील.. आणि आकाशात परत वीज चमकली पण यावेळी तो हसला नव्हता... मी हसलो होतो..

पावसाचा रेनकोट घालून मी बिचकत बिचकत बरसायला सुरुवात केली. मला पण ते जमत होते जे पावसाचे काम होते. उंच आकाशातून एक एक थेंब बनून बरसताना घराजवळच पहिली जाणीव झाली ती महादू काकांच्या घराचे छप्पर गळतय याची.. माझाच एक एक थेंब जेव्हा अलगद कोसळत होता तेव्हा खाली होणारी महादू काकांची धावपळ बघवत नव्हती. मग मी नाही थांबलो तिथे आणि तडक तिकडून लांब जायला निघालो. मी बराच वेळ बरसात होतो. खाली दिसणरे ओलेचिंब वातावरण बघून तीच आठवण आली आणि तडक तिकडे जायला निघालो. मनातून तिच्यावर भयंकर रागावलो होतो.. तिच्या घराच्या जवळ गेल्यावर मी अजूनच रागावलो आणि खाली पावसाचे थैमान सुरु झाले. जे काही दिसेल ते सगळे भिजवत सुटलो होतो. तिचा घरी जाणारा रस्ता, ती गल्ली , ते इमारतीचे दार, ती इमारत सगळे काही भिजवत सुटलो होतो. विचार  केला कि कडाडणाऱ्या विजेच्या आवाजांनी तिच्या घराची खिडकी फोडावी आणि मी तिच्या खिडकीत गेलो. तिला मी आल्याचे कळले की काय कोणास ठावूक पण ती खिडकीत उभी होती. अचानक तिने खिडकीतून हात बाहेर काढला आणि पाऊस म्हणून बरसणाऱ्या माझे थेंब अंगावर घेतले.. मी शहारलो.. ज्या पावसामुळे तिने मला वेडा ठरवले होते त्याच पावसात तिला भिजायचे होते.. मी खिडकीपासून मागे सरकलो तशी ती वळली आणि सरळ उशीत तोंड खुपसून रडू लागली.. मी परत निघालो होतो.. कारण आता सगळे काही ओले झाले होते. पाने, फुले,झाडे,वेली,रस्ते, गावे, तिच्या घराच्या खिडकीची चौकट आणि तिची उशी..

मी परत आलो शांतपणे. पावसाचा रेनकोट खुंटीला टांगला.. पावसाबरोबर बसून कॉफीचे घोट घेतले.. पाहत व्हायला आली होती. पाऊस परत निघाला होता."

इकडे सिंहगडावर ढग दाटून आले होते. आम्ही निघालो होतो . तो मला  घरी सोडताना नेहमीप्रमाणे "पुन्हा भेटू" न म्हणता "bye" म्हणाला आणि निघून गेला. त्यानंतर आजतागायत त्याची आणि माझी भेट नाही.

तो आज कुठे आहे? कसा आहे?   या सगळ्या प्रश्नांची उत्तर मात्र "कोणालाच ठावूक नाहीत"

 चेतन कुलकर्णी 

1 टिप्पणी:

  1. वा छानच.. तो पाउस होउन बरसला ही कल्पनाच खुप आवडली चेतन.. लिहित रहा मस्त लिहितोस.
    सुप्रिया काकू

    उत्तर द्याहटवा

परंपरा

परंपरा           एक गाव होते ... गावातले सगळे जण आनंदी , मनमिळाऊ आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे होते . त्या छोट्याश्...